श्री सत्यनारायणाची आरती

आरती

1

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा । पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ धृ॥

2

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण । परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥

3

घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण । प्रसाद भक्षण करितां प्रसन्न तूं नारायण ॥ जय ॥ १॥

4

शतानंद विप्रें पूर्वीं व्रत हें आचरिलें । दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥

5

त्यापासुनि हें व्रत या कलियुगिं सकळां श्रुत झालें । भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ जय ॥ २॥

6

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें । इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥

7

त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगिलें । स्मृति होऊनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्धरिलें ॥ जय ॥ ३॥

8

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली । क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥

9

अंगध्वजरायाची यापरि दुःखस्थिति आली । मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली ॥ जय ॥ ४॥

10

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं । पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥

11

अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि । ऐसा भक्तां संकटिं पावसि तूं चक्रपाणी ॥ जय ॥ ५॥

12

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जे जन आचरति । इच्छित पुरविसी त्यांतें देउनि संतति संपत्ती ॥

13

संहरती भवदुरितें सर्वहि बन्धनें तुटती । राजा रंका समान मानुनि पावसी श्रीपती ॥ जय ॥ ६॥

14

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा । भक्तिपुरस्सर आचरती त्यां पावसि जगदीशा ॥

15

भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा । मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ जय ॥ ७॥